शिक्षण हे सर्वांगीण विकास व परिवर्तनाचे महत्वाचे शस्त्र आहे. याचा वापर बौद्धिक व वैचारिकदृष्ट्या सक्षम व सुदृढ माणूस घडविण्यासाठी प्रभावीरितीने करता येतो.
केंद्रिय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने उच्च शिक्षणामध्ये अमुलाग्र सुधारणा करण्याच्या दिशेने पावले उचलली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून विद्यापीठे आणि महाविद्यालयांनी गुणवत्तापुर्वक शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी नियोजनात्मक निश्चितच मदत झालेली आहे.
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने इ. स. २०१३ मध्ये भारतातील उच्च शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी “राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान (National Higher Education Mission)” स्वीकारले आहे . या धोरणातून उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांना शैक्षणिक विकासासाठी योजनाबद्ध अनुदान देण्याचे प्रयोजन आहे.
उच्च शिक्षणातील या महत्वपूर्ण धोरणांचा स्वीकार करून त्यांची प्रभावी अंमलबजावणी केल्यानंतरच प्रत्येक क्षेत्रात उत्कृष्टतेचा ध्यास घेतलेली पिढी निर्माण होऊ शके. आंतरविद्याशाखीय अभ्यास पद्धतीचा स्वीकार करणारे अध्यापक आणि गुणवत्ता वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीने विद्यापीठ व शिक्षण संस्थात योग्य समन्वय साधने गरजेचे आहे.
उच्च शिक्षणातील या महत्वपूर्ण धोरणांना मूर्तिमंत स्वरूप देण्यासाठी उच्च शिक्षण, सहसंचालक कार्यालयाद्वारे सातत्याने महत्वपूर्ण पावले उचलली जात आहेत. या शैक्षणिक क्रांतीचे चक्र सर्वांच्या सहकार्याने गतिमान होईल ; याची मला मनोमन खात्री आहे. उच्च शिक्षण , सहसंचालक कार्यालय यासाठी सदैव कटिबद्ध राहील, याची मी ग्वाही देतो.
